डी एस के सक्सेस स्टोरी
पाचशे रुपये कर्जाने सुरवात आता ४००० कोटी रु. उलाढाल
------------------------------------------
https://vicharparivartan.blogspot.com
कष्टाला वय नसते त्याप्रमाणेच व्यवसाय करण्याला म्हणजेच ‘बिझनेस’ला कधीच वय नसते. कष्ट माणसाला खुपत नाहीत, त्याप्रमाणे व्यवसाय हादेखील कधी कटकटीचा वाटत नाही. व्यवसाय करण्याची बीजे माझ्यामध्ये बालवयातच रुजली. आई-वडिलांकडे हट्ट करायचा त्या वयातच मी कष्ट करायला लागलो. ते मला आवडायचे. म्हणजे मी कष्ट केलेच पाहिजेत अशी माझ्यावर जबरदस्ती नव्हती. कारण माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. तर आई शिक्षिका. पण कसबा पेठेमध्ये राहत असताना माझ्या आजूबाजूला असणारे माझे मित्र कष्ट करूनच शिक्षण घेत होते. त्यामुळे आपण काही तरी केले पाहिजे ही जाणीव माझ्यामध्ये आपोआप झिरपली गेली. माझे बालपण जसे अगदीच हलाखीचे नव्हते, तसेच ते फार सुखवस्तूदेखील नव्हते. त्यामुळे गरिबीत, कष्टात वाढलो असे नसले तरी काम करावे ही प्रेरणा मला माझ्या मित्रांकडून मिळाली. मी कसबा पेठेमध्ये राहायला होतो म्हणूनच उद्योजक होऊ शकलो. जर मी सदाशिव पेठेमध्ये राहत असतो, तर बी.कॉम होऊन कुठल्या तरी बँकेतच चिकटलो असतो आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीयाचे आयुष्य जगलो असतो. फार तर स्वत:चे घर झाले असते. पण उद्योजक झाल्यामुळे मी अनेकांच्या घराची स्वप्नपूर्ती करू शकलो.
कोणता व्यवसाय मी केला नाही असे नाही. इयत्ता तिसरी-चौथीत असल्यापासून म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी काम करतो आहे. अगदी भाजीची गाडी ढकलली. दुधाची आणि पेपरची लाइन टाकली. अलका चित्रपटगृहाजवळील साठे नर्सरीमध्ये दुपारी झाडांना पाणी घालायला मी जायचो. तेथून हातगाडीवर गुलाबाची रोपे घेऊन जात सदाशिव पेठेमध्ये त्याची विक्री करायचो. बालपणी मित्रांसमवेत क्रिकेट खेळायचो. आमचे मित्रांचे गणपती मंडळदेखील होते. पण मित्रांसमवेत कष्ट करण्याची मजा अनुभवली आणि त्यामध्ये आनंद मिळाला. त्या वेळी मला पाच रुपये मिळायचे. म्हणजे आताचे पाच हजार रुपये म्हटले तरी वावगे ठरू नये. एक आण्याला भेळेचा पुडा मिळायचा. मॅटिनी चित्रपट पाहण्यासाठी चार आणे लागायचे. एका दिवाळीमध्ये माझ्याकडे २२ रुपये होते. भावांना कपडे, मिठाई, फटाके घेतले. कष्टाची गोडी त्या वयात लागली आणि तीच पुढे उद्योजक होण्यासाठी साहाय्यभूत ठरली. आज माझा उद्योग सात देशांमध्ये आहे.
सुरुवातीला बिनभांडवली व्यवसाय केले. जिजामाता बागेसमोर पोते टाकून कैरी, चन्या-मन्या बोरे विकणे, लॉटरी तिकिटे, फटाके विकणे असे उद्योगही केले. त्या वेळी शालेय विद्यार्थ्यांना फटाके उधार दिले जायचे. हे ध्यानात ठेवून अनेक तरुणांना उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी आज मी फटाके विकण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देतो. अर्थात हे काही उपकार करीत नाही. जे करतो ते माझ्या आनंदासाठी. परीक्षा संपली की जुनी पुस्तके विकत घ्यायचो आणि जोगेश्वरी मंदिरासमोर बसून विकत असे. एकदा एका ग्राहकाकडे सुट्टे पैसे नव्हते. ते मागण्यासाठी मी दुकानदाराकडे गेलो, तर त्याला मी शिव्या देतो असे वाटून त्याने माझ्या थोबाडीत मारली. त्याचे कारण आजही मला समजलेले नाही. एकाकडे मी पेपरची लाइनही टाकली. पूर्वी पुण्याचा पाऊस गुणी होता. रात्री पडायचा आणि कामाच्या वेळामध्ये थांबायचा. एक दिवस तासभर उशीर झाल्यामुळे मालकांनी मला नोकरीवरून काढून टाकले. त्या दिवशी ‘नोकरी करायची नाही’ असा निर्धार केला. त्यानंतर मी स्वत:ची पेपर लाइन सुरू केली. पहाटे साडेपाच ते सात या वेळात पुण्यातील मराठी वृत्तपत्रे आणि नंतरच्या टप्प्यात मुंबईहून येणारी वृत्तपत्रे अशा दोन वेळा काम करावे लागायचे. पेपर लाइनमुळे टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन हा धडा मिळाला. दर सोमवारी लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांच्या पाटय़ा धुवायच्या हादेखील व्यवसाय केला आहे. २० पाटय़ा धुतल्या की शंभर रुपये मिळायचे. त्या काळी एसएससीचे सविस्तर निकाल वृत्तपत्रांत प्रसिद्ध व्हायचे. तेव्हा चार आण्याचा अंक आठ आण्याला विकायचो. त्या वेळी मला ८० रुपये मिळाले होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टेलिफोन सुगंधी करण्याचा ‘टेलिस्मेल’ हा व्यवसाय सुरू केला. कॉलेज करताना किलरेस्कर ऑईल इंजिनमध्ये जाण्याची संधी मिळाली. तेथे टेलिफोन ऑपरेटरची खोली होती. तेथे जाऊन उत्सुकतेने मी कानाला इयर फोन लावला. पण माईक जवळ घेताना मला वेगळाच म्हणजे डेटॉलचा वास आला. माईकवरून बोलताना अनेकदा थुंकी त्यावर उडायची. त्याचा त्रास होऊ नये म्हणून डेटॉलचा बोळा लावलेला असायचा. याऐवजी अत्तर लावले तर सुगंधी वास येईल या कल्पनेतून टेलिस्मेल उद्योगाचा जन्म झाला. यानिमित्ताने अलका चित्रपटगृहाजवळील रवी बिल्डिंग येथे ऑफिस घेतले. बँकेचे कर्ज, बिल बुक या गोष्टींची पूर्तता केली. ५०० रुपयांच्या भांडवलासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, नवी पेठ शाखेतून कर्ज घेतले. प्राचार्य वसंतराव नूलकर हे स्वत: मला बँकेत घेऊन गेले आणि कर्जासाठी जामीन राहिले. ‘बँकेचे कर्ज वेळेत फेडलेस तर एक दिवस बँक तुला पाच लाख रुपये कर्ज देईल’, असे सरांनी आवर्जून बजावले. आता बँका मला हवे तेवढे कर्ज द्यायला तयार आहेत. त्याच वेळी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहता येणे शक्य नसल्याने मी गरवारे महाविद्यालयातून वाडिया महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. नूलकरसरांनी सायंकाळी सातनंतर त्यांच्या घरी माझा अभ्यास घेतला. त्यामुळे मी पदवीधर होऊ शकलो.
टेलिफोन पुसण्यासाठी माझ्याकडे मुले-मुली मिळून २५ जण कामाला होते. आठवडय़ातून एकदा याप्रमाणे वार ठरलेला असायचा. महिन्याला तीन रुपये मिळायचे. असे दीडशे टेलिफोन पुसायचो. १९७० मध्ये दररोज अडीच हजार रुपये मिळायचे. सर्व खर्च वजा जाता मला दरमहा दीड हजार रुपये मिळायचे. पदवीधर झाल्यावर मी बँकेमध्ये क्लार्क झालो असतो तर त्या वेळी मला दरमहा २१० रुपये पगार मिळाला असता. त्यापेक्षा दीड हजार रुपये अधिक नाहीत का? आजही हा व्यवसाय सुरू असून ग्रामीण भागामध्ये अत्तराच्या पट्टय़ा दिल्या जातात. पूर्वीचे फोन वेगळे होते. आता फोनचे स्वरूप बदलले असून मोबाइलच्या जमान्यामध्ये लॅण्डलाइनचेही महत्त्व कमी झाले आहे. नवी पेठेमध्ये सिंधी माणसाकडून लाकडी स्टॉल विकत घेऊन अंडी, ब्रेड, बटाटेवडा विकण्याचाही धंदा केला आहे. शनिवार पेठेमध्ये ज्योती फोटो स्टुडिओसमोर भाजीविक्रीचे दुकान होते. अंबर एन्टरप्रायझेस या फर्ममार्फत स्टेशनरी पुरविण्याचा व्यवसाय केला. एवढेच काय, पर्वती परिसरात प्रिंटिंग प्रेसदेखील सुरू केली. मात्र भागीदाराने फसविल्यामुळे तोटय़ात गेलेल्या व्यवसायापासून दूर गेलो.
रवी बिल्डिंग येथे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. रंगवून देणारे ‘पेंट ऑल’ हे रास्ता पेठेत दुकान सुरू केले. तेव्हा १५० पेंटर कामाला होते, वॉटरप्रूफिंग, स्प्रे पेटिंग, फर्निचर, जुने ओटे, फ्लॅटची दुरुस्ती कामे केली. घराशी संबंधित जुन्या गोष्टींची दुरुस्ती करीत आहोत, तर मग घरच का बांधू नये या उद्देशातून १९८० मध्ये बांधकाम व्यवसायामध्ये प्रवेश केला. शंतनुराव किलरेस्कर यांच्या घरी टेलिफोन पुसायला जायचो तेव्हा ‘एसएलके- चेअरमन अॅण्ड मॅनेिजग डायरेक्टर’ ही पाटी वाचून प्रेरणा मिळाली. त्यामुळे १९९१ मध्ये डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स ही कंपनी पब्लिक लिमिटेड केली. अभिनेत्री माधुरी दीक्षित संचालक मंडळामध्ये होती. मला ऑटोमोबाइलचे वेड असल्यामुळे ‘टोयोटा’ची एजन्सी घेतली. ३१ डिसेंबर १९९९ रोजी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाने मॉडेल कॉलनी येथील पहिल्या शोरूमचे उद्घाटन केले. डीएसके टोयोटाचे भारतातील मोठे विक्रेते असून आठ जिल्ह्य़ांत १२ शोरूम आणि ६ वर्कशॉप्स आहेत. आगामी दोन वर्षांत आणखी ८ शोरूम्स होतील. डीएसके ह्य़ूसंग या मोटारसायकलची निर्मिती आणि ‘हिनो’ या ट्रकची निर्मिती केली जात आहे.
शैक्षणिक क्षेत्रात डीएसके विश्व येथे डीएसके स्कूलमध्ये आयसीएसई हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. फ्रान्स सरकारशी करार करून ‘डीएसके सुपइनफोकॉम’ ही संस्था कार्यान्वित झाली आहे. यामध्ये दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून येथे अॅनिमेशन, व्हिडीओ गेम आणि प्रॉडक्ट डिझायनिंग हे पाच वर्षांचे अभ्यासक्रम शिकविले जातात. ‘फेरारी’ या गाडीच्या प्रॉडक्ट डिझायनिंगमध्ये आमच्या संस्थेला पहिला क्रमांक मिळाला आहे. डीएसके एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून हॉलीवूडसाठी मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. डीएसके ट्रॅव्हलच्या माध्यमातून हेलिकॉप्टर आणि विमाने भाडय़ाने देण्याबरोबरच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सेवा देण्यात येत आहेत. डीएसके टेक्नॉलॉजीज प्रा. लि.च्या माध्यमातून सौरऊर्जेवर चालणारे आणि ग्रामीण भागाला आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविणारे मोबिलिज उपकरण विकसित करण्यात आले आहे. केवळ पाचशे रुपये कर्जावर सुरू झालेल्या या वाटचालीचे रूपांतर १४ व्यवसायांमध्ये झाले असून चार हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे, ती केवळ कष्ट आणि कोणत्याही कामाची लाज न बाळगण्याच्या वृत्तीमुळेच.
- डी. एस. कुलकर्णी
Share
No comments:
Post a Comment
Thank You..!
For your valuable message...