मनाशी सुसंवाद 

vicharparivartan.blogspot.com

                     परीक्षेच्या तणावपूर्वक वातावरणात विद्यार्थ्यांना गरज असते ती सकारात्मक विचारांची. हे सकारात्मक विचार 'सेल्फ टॉक' केल्यावर प्रभावीपणे जाणवू लागतात. मात्र सेल्फ टॉकमध्ये व्हिज्युअलायझेशनचे महत्व काय? आणि भविष्य उज्वल करण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो? याविषयी.... सुचित्रा सुर्वे,

सेल्फ टॉकचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होत असतो. सकारात्मक विचार मोठ्याने स्वत:च्या मनाला ऐकवले तर दिवसभर आपला मूड चांगला राहतो. त्याचबरोबर ताण कमी होऊन आपली कार्यक्षमताही वाढते. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना मूड स्विंगची समस्या असलेली आपण पाहिली असेल, अनुभवली असेल. क्षणात चांगलं वागणारी व्यक्ती दुसऱ्या क्षणाला विचित्र वागते किंवा उदास झालेली असते. याचं कारण म्हणजे आपला स्वत:च्या मनाशीच नसणारा संवाद. स्वत:चा स्वत:शी योग्य प्रकारे संवाद झाला तर मन मोकळं होऊन ताण कमी होतो. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे केव्हा आणि कोणता विचार करायचा हे आपलं आपल्याला ठरवता यायला हवं. यासाठीच आपल्या मनावर आणि विचारांवर आपलं नियंत्रण असायला हवं. सेल्फ टॉक वाढवण्याचा आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे 'व्हिज्युअलायझेशन'. आपण ठरवलेलं एकेक ध्येय साध्य करत गेल्यावर आपण कसे दिसू/असू, याचं चित्र डोळ्यांसमोर उभं करण्याची प्रक्रिया म्हणजे 'व्हिज्युअलायझेशन'. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्याला काय व्हायचंय/ आपल्याला काय साध्य करायचं आहे त्याचं चित्र जर तुम्ही डोळ्यांसमोर आणू लागलात आणि त्याला सेल्फ टॉकची जोड दिली तर तुम्हाला अशक्य असं काहीच राहणार नाही. 'व्हिज्युअलायझेशन'च्या या संकल्पनेला तुम्ही कल्पनाविलास/ दिवास्वप्नं पाहणं किंवा दिवसाढवळ्या स्वप्न पाहणं याच्याशी जोडू शकत नाही. कारण या दोन्ही संकल्पनांमध्ये प्रचंड तफावत आहे. या दोन्हींमध्ये असा फरक असण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण दिवास्वप्न पाहत असतो तेव्हा आपण फक्त आपल्या कल्पनांचे खेळ करत असतो. ते स्वप्न वास्तवात उतरणार नाही, याची आपल्यालाही खात्री असते. मात्र 'व्हिज्युअलायझेशन'द्वारे आपण जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा ते खरं व्हावं, यासाठी स्वत:च स्वत:ला प्रोत्साहन देत असतो. ज्यामुळे आपले नकारात्मक विचार सकारात्मकतेत बदलू शकता. आपलं मन अशी एखादी गोष्ट पाहू शकतं, जे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणं शक्य नसतं. आपलं मन काय विचार करतंय, यावर विश्वास ठेवण्यास तुम्ही तुमच्या मनाला सांगू शकता. त्यामुळेच 'व्हिज्युअलायझेशन'च्या प्रक्रियेचा परिणाम तुम्हाला काम करण्यास प्रोत्साहन देईल किंवा उद्युक्त करेल असं म्हणायला हरकत नाही. 'व्हिज्युअलायझेशन'ची प्रक्रिया अवलंबताना टप्प्याटप्प्यात विचार करा आणि त्या दृष्टीने पावलं उचला. आपलं 'व्हिज्युअलायझेशन' अधिक प्रभावीरित्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा : * मन शांत असेल, अशा वेळी 'व्हिज्युअलायझेशन' करा. * आपल्याला काय हवंय/काय बनायचंय याचं चित्र मनापुढे उभं करताना ते मोठ्याने स्वत:लाच ऐकवा (सेल्फ टॉक). * आपल्या मनातील चित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीचाही आढावा घ्या. * तुम्हाला माहित असणारी आणि ती घडणार आहे अशी गोष्ट 'व्हिज्युअलाइज' करण्याचा प्रयत्न करा. * आपल्या डोळ्यांपुढे चित्र उभं करताना ते अधिक स्पष्ट, मोठं आणि अधिक प्रभावी असंच असू द्या. * ही सगळी प्रक्रिया पार पाडताना त्याचा आनंद लुटा.

Share